बंडखोरांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा, मेळावा घेण्याचा तडाखा त्यांचा चालू आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मनमाड येथे ते आज सभा घेणार असून बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी त्यांना आव्हान देत त्यांच्या सभेवेळी भेटून काही सवाल विचारणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून कांदे यांचा ताफा नाशिकमध्ये अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरे यांच्या भेटीला निघाले आहेत. त्याचवेळी शिवसैनिकांकडून नाशिकमधील पिंपळगाव टोलनाक्यावर त्यांचा ताफा अडवला. पण त्यातून सुहास कांदे मनमाडकडे रवाना झाले. यावेळी ते हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल करणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का? असा सवाल सुहास कांदे विचारणार आहेत. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरेंनी मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर आमदारकीचा राजीनामादेखील देण्यात तयार आहे.’ असे म्हणत कांदे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान केले आहे.