गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य व जिल्हा परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आज गुहागरमध्ये कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. त्यावेळी लसीकरण केंद्रात विश्रांतीसाठी महिला व पुरुष असे दोन कक्ष किमान दोन खाटासह सज्ज ठेवावेत. अशी सूचना नगरपंचायत प्रशासनाला जाधव यांनी केली.
विक्रांत जाधव गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी त्यांनी गुहागरची निवड केली. कोविन ॲपवर नोंदणी केल्यावर त्यांना गुहागरच्या लसीकरण केंद्रात शुक्रवारी लसीकरणाची वेळ मिळाली होती. त्यामुळे आज लसीकरणासाठी विक्रांत जाधव गुहागरला आले होते. लस घेवून झाल्यावर त्यांनी लसीकरण केंद्राची पहाणी केली. लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विक्रांत जाधव यांनी चौकशी केली. तसेच लसीकरण केंद्रात आलेल्या युवकांबरोबर संवाद साधला. अन्य कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे. याची विचारणा केली. 18 ते 44 वयोगटातील कितीजणांचे लसीकरण झाले आहे याची माहिती घेतली.
त्यावेळी लसीकरण केंद्रातील विश्रांती कक्षात एकही खाट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष नाही ही गोष्ट ही त्यांना खटकली. त्यांनी गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर तसेच ग्रामीण रुग्णालय गुहागरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत यांना सांगितले की, या लसीकरण केंद्रात 18 ते 44 व 45 वरील अशा दोन्ही गटातील लसीकरण होत आहे. लसीकरणानंतर कोणताही त्रास होत नाही. असे गृहित धरुन चालणार नाही. एखाद्या ग्रामस्थाला त्रास होवू शकतो. हे गृहित धरुन किमान दोन खाटा विश्रांती कक्षात असल्या पाहिजेत. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षाचीही रचना करा. शाळा व्यवस्थापन समितीला सांगून आणखी एक वर्ग खोली मोकळी करु घ्या.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर उपस्थित होते.