गुहागर तालुक्यातील 4 गावांना पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र टँकर नाहीत. अन्य पाणी टंचाई युक्त गावांनी पत्र दिले नाही. अंजनवेलमधील दुषित झालेल्या विहीरीबाबत कार्यवाही केली नाही. असे एका मागोमाग एक नकारत्मक विषय समोर आल्याने पाणी टंचाई आढाव्याचे वेळी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव वैतागले. मागणी नाही, टँकर नाही म्हणून तुम्ही लोकांना पाणीच पुरवणार नाही का. असा प्रश्र्नच त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. वेलदूर, नवानगर, धोपावे आणि रानवीसाठी कोणत्याही परिस्थितीत टँकर उपलब्ध करुन द्या. त्रिशुळसाखरीमध्ये छोट्या वाहनांनी कसा पाणी पुरवठा करता येईल याची माहिती घेवून मला सांगा. अशी ताकीदच जाधव यांनी पाणी पुरवठा विभागाला दिली.
गुहागर पंचायत समितीमध्ये पाणी टंचाईबाबत आढावा सुरु होता. त्यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी छत्रेंनी वेलदूर, पाचेरी सडा, त्रिशुळ साखरी, रानवी या गावांना पाणी पुरवठा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर धोपावे, नवानगर या गावात पाणी टंचाई आहे की नाही. तुम्ही या गावांना भेटी दिल्यात का. अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विहीरीतील पाणी प्रदुषित झाले आहे. त्याची पहाणी केलीत का. भुजल सर्वेक्षण विभागाला सांगितले का. अशी प्रश्र्नांची सरबत्ती विक्रांत जाधव यांनी केली. त्यावेळी धोपावे व नवानगर गावाने पाण्याची मागणीच नोंदवली नव्हती. अंजनवेलमध्ये कंपनीने पाणी दुषित नसल्याचा तर प्रदुषण मंडळाने पाणी दुषित असल्याचा अहवाल दिल्याचे छत्रेंनी सांगितले. त्यामुळे विक्रांत जाधव वैतागले. ग्रामपंचायतीनी पाण्याची मागणी केली नाही म्हणजे पाणी टंचाई नाही असे गृहित धरायचे का. ज्या गावांना मागणी केली त्या गावांचा पाणी पुरवठा सुरु झाला का. या दोन्ही प्रश्र्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडे नव्हती.
अखेर तहसीलदार सौ. लता धोत्रे व गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांनी आपल्याकडे टँकर उपलब्ध नाहीत. सध्या मनिषा कन्स्ट्रक्शनने वेलदूर गावाला पाणी पुरवठा सुरु केला आहे. तो टँकर आपल्या ताब्यात नाही. मनिषा कन्स्ट्रक्शन व ग्रामपंचायत त्याचे नियोजन करते. अशी माहिती अध्यक्षांना दिली. सदरची माहिती अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई कृती आराखड्याचे अध्यक्ष आमदार जाधव यांना का दिली नाही. ही अडचण आज मे महिन्यात आढावा घेतला म्हणून समजत आहे. असे सांगत विक्रांत जाधव यांनी मनिषा कन्स्ट्रक्शनलाच प्रशासनाने आणखी टँकर पुरविण्याची विनंती करावी. सध्या वेलदूरबरोबरच रानवी, नवानगर, धोपावे या गावांना पाणी पुरवठा करण्यात सांगावे. अन्य खासगी टँकर काय दराने पाणी पुरवठा करतील. याचीही चौकशी करा. तोपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था होते का ते पहातो. आरजीपीपीएल कंपनी यापूर्वी टँकरने पाणी पुरवठा करत होती. त्यामुळे या कंपनीलाही पाणी पुरवठा करण्यास सांगावे. पाणी पुरवठ्यास कंपनीने नकार दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. अंजनवेल ब्राह्मण वाडीतील विहीर आणि जमीन जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. त्याचे पाणी दुषित का झाले याची माहिती भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडून घ्या. त्या अहवालानंतर दोषींवरही गुन्हे दाखल करा. अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रविण ओक, सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनिल पवार, पांडुरंग कापले, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, तहसीलदार सौ. लता धोत्रे, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी प्रकाश भोसले, गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी नगरसेवक दिपक कनगुटकर, युवा सेना तालुकाधिकारी अमरदिप परचुरे, समित घाणेकर, इम्रान घारे, नरवणचे सरपंच, ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर बळवंत यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.