(मुंबई)
राज्यात शिंदे-भाजपा सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत, तर मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे. कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडून 100 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून वेशांतर करून व सापळा रचून हॉटेल ओबेराय येथे एका आरोपीला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आली आहेत.
सध्या मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत 4 आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मंत्रीपद देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या टोळीने 3 ते 4 आमदारांना गळाला धक्कादायक लावल्याची माहिती मिळाली होती. त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आरोपींनी आमदारांचा विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत मंत्री महोदय यांनी आपल्याशी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर 2-3 वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून त्यांनी मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. फोनवरील संभाषणानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली. मंत्रीमंडळात सहभागासाठी 90 कोटी द्यावे लागतील तर त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील असे या आमदाराला सांगितले होते.
दरम्यान, आरोपीने नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी सापळा रचत एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर 3 आरोपीची नावे समोर आली आहेत. याबाबत एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख ( वय – 41) कोल्हापूर, योगेश मधुकर कुलकर्णी ( वय – 57) पाचपाखाडी- ठाणे, सागर विकास संगवई ( वय- 37) पोखरण रस्ता- ठाणे व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी ( वय- 53 ) नागपाडा मुंबई अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती आमदारांची फसवणूक केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Post Views: 3,394