( चिपळूण / प्रतिनिधी )
कुंभार्ली घाटात आज मंगळवारी दुपारी दरड कोसळली. यापूर्वीही ५ जुलै रोजी दरड कोळण्याची घटना घडली होती. आणि आज पुन्हा दुपारच्या दरम्यान दरड कोसळली आहे.
घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दरड कोसळली. तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जेसीबी पाठविला असून माती आणि खडक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दरड बाजूला केल्यानंतर घाटात खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर घाट रस्त्यामध्ये दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.