( नवी दिल्ली )
ब्रिटनमधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक मजबूत स्थितीत आहेत. सोमवारी झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या फेरीत ऋषी यांना ३५७ मते पडली असून ११५ मतांनी आघाडीवर होते. तर, आज चौथ्या फेरीचे मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान होणार असल्याची चर्चा आहे.
ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत तिसऱ्या फेरीतील आघाडीनंतर ऋषींनी ब्रिटनला अधिक मजबूत बनवण्याबाबत भाष्य केले आहे. आपण एकत्रितपणे आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारू शकतो. तसेच, ब्रेक्झिट वाचवू शकतो, असे म्हटले आहे. ऋषी सुनक यांच्याशिवाय कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे तीन उमेदवार पेनी मॉडेंट, लिझ ट्रस आणि केमी बॅडेनोक अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. तर, तिसऱ्या फेरीत कमी मते मिळाल्याने टॉम तुगेंधत हे शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
ब्रिटनमधील निवडणुकीच्या या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डाउंट ८२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी लिझ ट्रस ७१ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कॅमी बडेनोच ५८ मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. या फेरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले टॉम तुगेंधत यांना केवळ ३१ मते मिळाली. पंतप्रधान पदासाठीच्या या शर्यतीत गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहणार असून, ५ सप्टेंबरपर्यंत विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी आघाडी कायम ठेवल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.