(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील सुर्वे स्टॉप ते भेल्या पऱ्या या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसातच पडत असल्याने सर्वच वाहनचालकांसाठी हा रस्ता आता डोकेदुखी ठरला आहे. येथील ठावरेवाडी ते मानेवाडी या मुख्य रहदारीच्या ठिकाणी हा रस्ता असताना निवेंडी भगवतीनगर ते गणपतीपुळे या मुख्य पर्यटन स्थळाला जोडला गेल्याने या रस्त्याला वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच याच मुख्य मार्गाने पुढे भगवतीनगरकडे जाताना गणपतीपुळे देवस्थानचे सुसज्ज असे भक्तनिवास आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज विविध ठिकाणच्या भाविक व पर्यटकांच्या गाड्या ये- जा करीत असतात.
सर्वच लहान-मोठी वाहने या मार्गावरून जात असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो परंतु या रस्त्याच्या कामासाठी गणपतीपुळे पर्यटन विकासाच्या आराखड्यातून निधी मंजूर असताना देखील अद्यापही या रस्त्याचे काम केले जात नसल्याने ग्रामस्थांमधून खूप मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत गणपतीपुळे येथील मानेवाडी व ठावरेवाडी प्रभागातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या प्रमुख सदस्यांनी वारंवार संबंधित विभागाच्या खात्याकडे पाठपुरावा करून आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच कल्पना पकये यांच्या विशेष प्रयत्नाने लक्ष घातले आहे. परंतु अद्यापही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे किंवा नव्याने रस्ता करण्याकडे कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत याबाबत गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही वारंवार संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे परंतु अद्याप या रस्त्याचे काम करण्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नसून आम्ही पुन्हा एकदा संबंधित खात्याला पत्र देणार आहे .
या रस्त्याच्या संदर्भात ज्या काही लगतच्या स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी जाणार आहेत त्या देण्याबाबतही ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याची माहिती ही सरपंचांनी दिली आहे. त्यामुळे गणपतीपुळेसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी हा रस्ता असल्याने हा रस्ता नव्याने करण्याबाबत पावसाळ्यानंतर प्रामुख्याने तात्काळ कार्यवाही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून हाती घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.