(मुंबई)
मुंबई उच्च न्यायालयात ९ अतिरिक्त न्यायमूर्तींची निवड करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय वृंदाने अतिरीक्त न्यायमूर्तीच्या नावाची शिफारस केली होती. केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी याबाबतची अधिसूचना जारी करत अतिरिक्त न्यायमूर्तीच्या निवडीला मंजुरी दिली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या ५४ वरुन ६३ झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय वृंदाने अतिरीक्त न्यायमूर्ती पदासाठी ॲड किशोर संत, ॲड वाल्मिकी मेन्झेस, ॲड कमल खटा, ॲड शर्मिला देशमुख, ॲड अरुण पेडणेकर, ॲड संदीप मारने, ॲड गौरी गोडसे, ॲड राजेश पाटील आणि ॲड आरीफ डॉक्टर यांच्या नावाची शिफारस केली होती.
केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी शनिवारी याबाबतची अधिसूचना जारी करत या वकिलांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीची ९४ पदे आहे. त्यात मागील दोन महिन्यात काही न्यायमूर्ती निवृत्त झाले तर काहींना दुसऱ्या राज्यात बढती मिळाली.