(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा लोटेमाळ या शाळेला केंद्र शासनाकडून देण्यात येणारा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2022 प्राप्त झाला आहे. शाळेने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हयाचे नाव रोशन केले आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
या शाळेची निवड शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाचे व बांधकामचे अधीक्षक अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थांचे दोन प्रतिनिधी या जिल्हास्तरीय समितीने केली. सर्वसाधारण श्रेणीमध्ये 8 आणि उपश्रेणीमध्ये 30 पुरस्कार प्राप्त शाळांचा समावेश आहे. सर्वसाधारण श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे गुरववाडी शाळा क्र.1 यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक गुहागर तालुक्यातील अंजनवेल शाळा क्र. 2 ने पटकावला.
लोटेमाळ आदर्श केंद्रीय शाळा ही जिल्हयातील पहिली सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. राज्य गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत या शाळेची निवड झाली होती. डिजिटल ग्रंथालय असणारी लोटेमाळ ही जिल्हयातील एकमेव शाळा आहे. या शाळेत स्वच्छ परिसर, बैठक व्यवस्था, पुरेशा प्रमाणात मुलांना शौचालये आणि पिण्याच्या पाणी व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे.