(साईशा / राजापूर)
तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदे वाडीत गुरुवारी 14 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास जुबेदा अन्वर खान यांच्या घरात अंदाजे 4 ते 5 महिन्याचा बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
हा बिबटा जुबेदा खान यांच्या घरात शिरला आणि जुबेदा खान यांच्यावर हल्ला करणार त्याचवेळी त्या ठिकाणी काशीनाथ जाधव आले. त्यानी आरडाओरडा केला. यावेळी बिबट्याला पळवून लावत असताना बिबट्याने जुबेदा खान यांना सोडून काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात काशिनाथ जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या बिबट्या सोबत मादी असण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या वावरण्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या शिरल्याची माहिती कळतच सारे जमा झाले. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावलं.
यापूर्वी असा प्रकार या विभागात सहा महिन्या पूर्वी बलवंत शिर्के यांचा बैल रानात चरण्याकरिता घेऊन गेले असता बिबट्याने मारला होता. त्यानंतर आठ दिवसात प्रभाकर लिंगायत यांची गाय वर बिबट्याने हल्ला चढविला होता. याची लेखी तक्रार वनविभागाकडे केली आहे.
यापूर्वी अनेक वेळा कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला आहे. कुवेशी गावातील अनेक शेतकरी हे आंबा व काजू बागायतदार, नागली व भात शेती अशी अनेक प्रकारची शेती करत असून शेतकरी एक-एकटे शेतात ये-जा करत असतात. तसेच काही शेतकरी गुरे व शेळ्या मेंढ्या चरण्याकरिता नेत असतात. तरी कुवेशी गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी याची वनविभागाने वेळीच गंभीर दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.