(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे जमीन खचल्याने एका घराला तडे गेले आहेत. येथील ग्रामस्थ सीताराम बाळलिंग गुरव व दत्ताराम बाळलिंग गुरव यांच्या घराचा चौथरा खचला असून भिंतीना तडे गेले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील 5 जणांची शेजारी राहणाऱ्या सुनंदा सावंत यांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उक्षीतील दत्ताराम गुरव व त्यांची पत्नी वयस्कर दाम्पत्य आहे. ते निराधार आहेत. संजय गांधी घरकुल योजनेतून त्यांचे घर बांधण्यात आले आहे. नियतीने त्यांना निराधार तर केले शिवाय डोक्यावरील छप्पर सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पावसामुळे त्यांच्या या घराला धोका निर्माण झाला आहे. घराला तडे गेले आहेत.
बुधवार 13 जुलै रोजी गावचे सरपंच किरण जाधव, पोलीस पाटील अनंत जाधव, माजी सरपंच मिलींद खानविलकर, राजू देसाई, तलाठी सौ. लोहार, मंडळ अधिकारी पाटील तसेच उक्षी ग्रामस्थांनी गुरव यांच्या घराची पाहणी केली. या पाहणीत असे दिसून आले की, घराला तडे गेल्याने ते आता धोकादायक स्थितीत आहे. अशावेळी दत्ताराम गुरव आणि सीताराम गुरव या कुटुंबाला या ठिकाणी रहाणे सुरक्षित नाही. दोन्ही गुरव कुटुुंबियांची व्यवस्था जवळच्या जाधव यांच्या घरी करण्यात आली आहे.