( प्रतिनिधी / रत्नागिरी )
तरुणाने मोबाईलवरुन ऑनलाईन कर्ज घेवून परत केले, मात्र जास्तीच्या पैशाची मागणी करत त्याला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने फोटो एडीट करुन त्यावर बदनामीकारक मजकूर टाकल्याने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सम्राट सहदेव गवळी (22, पाली बस स्थानकासमोर, मूळ आसगे लांजा) याने पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट याने मोबाईल घेण्यासाठी प्ले स्टोअरवरुन कॅश वर्ल्ड ऑनलाईन लोन अॅप डाउनलोड करुन त्यावरुन 2277 रुपयांचे लोन घेतले. त्यानंतर हे लोनचे त्याने 7 दिवसांमध्ये व्याजासह 3796 रुपये भरले. जास्तीचे पैसे भरुनही त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्याने पैसे भरण्यास नकार दिल्याने सम्राट याला 9696201337, 9632556360, 9618030950 अशा मोबाईलवरुन कॉल येवू लागले. वारंवार पैसे भरण्याचा तगादा लावला जात होता. 11 जुलै रोजी सकाळी 9.30 वा. पुन्हा कॉल आला. समोरील व्यक्तीने सांगितले, तू अॅप डाउनलोड केले त्यावेळी तू आम्हाला मिडिया परमिशन दिली आहे असे सांगून सम्राट याच्या मोबाईल गॅलरीमध्ये असलेला त्याचा पर्सनल फोटो घेवून तो एडीट केला. आणि त्यावर बदनामीकारक मजकूर टाकून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या सम्राट याने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी अज्ञातावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला.