जिल्हा परिषदेचे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे.
अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी रवाना होण्याआधी डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांना याचा धक्का बसला आहे. शिक्षक रणजीतसिंह डिसले ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दरम्यान 2022 च्या जानेवारी महिन्यात शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी तब्बल 3 वर्षे डिसले गुरुजी अनुपस्थित असल्याचा आरोप केला होता.
2021 मध्ये अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर…
ग्लोबर टीचर अवॉर्ड विजेते सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना आता अमेरिकन सरकारकडून स्कॉलरशिप जाहीर झाली होती. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली होती. ही प्रतिष्ठेची असलेली स्कॉलरशिप संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा देण्यात आली होती.
लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती.