(मुंबई)
राज्यातील ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याक समूहातील राजकीय, सामाजिक संघटना आणि त्यांच्या नेत्यांना एकत्र आणून लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ९२ नगरपालिकाचे निवडणूक पत्रक जाहीर केले असून या निवडणुका लोकशाही आघाडी एकत्रितरित्या लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर राज्यात सशक्त पर्याय उभारण्यासाठी बहुजन समाजातील राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली राजकीय विचारधारा म्हणजेच संविधानातील समता, बंधुत्व, न्याय आणि एकता हे लोकशाही आघाडीचे ध्येय धोरण असेल असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
लोकशाही आघाडीतील पक्ष
बहुजन क्रांती दल, गोंडवाना गणतंत्र पार्टी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी एनटीपार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय ओबीसी मुस्लिम संघटना, पारधी आदिवासी महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय ओबीसी महिला संघ, यदुवंशी सेना, खोरीप (रिपाई खोब्रागडे गट), जनहित लोकशाही पार्टी, इंडियन सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, महाराष्ट्र भीम आर्मी, जयभीम क्रांती दल, समता सैनिक दल, विदर्भ विचार मंच, राष्ट्रीय जनता दल यांचा या लोकशाही आघाडीत समावेश आहे.