(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी असे महामार्गचे काम सुरु असताना सर्वच कामात आलबेल असून विना परवाना शासनाचा महसूल बुडवत अनधिकृत क्रेशर आणि उत्खनन सुरु आहे. त्या विरोधात आज आंबेड येथे रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु होते. मात्र रत्नागिरी प्रांतधिकारी यांच्या लेखी पत्रानंतर आणि किरण सामंत यांच्या मध्यस्थी नंतर उपोषणास स्थगिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ला लागून ग्रामपंचायत हद्द कोळंबे येथे असलेला अनधिकृत मोबाईल क्रशर सुरु आहे. आंबेड ते मानसकोंड येथे जोरदार विना परवाना बोरवेल ब्लास्टिंग केले जात असून त्याचा हादरा परिसरातील घरांना बसत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाकडून आवश्यक असणारा दाखला आणि क्रेशरसाठी आवश्यक असणारी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून क्रशर सुरु असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली महसूल विभागाकडून माहिती मागवली असता त्यांनी कोळंबे येथे सुरु असलेल्या क्रशरला कोणतीच परवानगी नसल्याचे लेखी कळवले आहे. तसेच बोरवेल ब्लास्टिंग आणि होत असलेले उत्खनन हे विनापरवाना असल्याचे खनिजकर्म विभागाने कळवले आहे. यांच्या वाहतुकीची कोणतीही परवानगी नसताना वाहतुक सुरु आहे. शासनाचा महसूल बुडवण्याचे हे काम सुरु आहे. महामार्गावरील खड्डे आणि इतर केलेली चुकीची कामे याबाबत आजचे उपोषण ठेवण्यात आले होते.
यामध्ये प्रांतधिकारी रत्नागिरी यांनी संबंधित विषयाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार संगमेश्वर यांना दिले असून लवकरच कारवाई करणार असल्याचे कळवले आहे. त्यामुळे या उपोषणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यध्यक्ष परशुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र गुरव, विनायक खातू, सलाउद्दीन बोट आदी लोक उपस्थित होते.