(मुंबई)
महाराष्ट्राच्या राज्यपालांबद्दल बोलण्यास खूप स्कोप आहे, मात्र आपण बोलणार नाही. त्यांनी ४८ तासांत, इतक्या कमी वेळात दाखविलेली तत्परता ही चमत्कारिक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या सक्रियतेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता खासदार शरद पवार म्हणाले, माझ्या राजकीय कारकीर्दीत अनेक राज्यपाल पाहिले, पण या राज्यपालांसारखा चमत्कारिक राज्यपाल दुसरा पाहिला नाही. पूर्वीच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, मात्र महाविकास आघाडी सरकारने या राज्यपालांना स्पीकर नियुक्तीसंदर्भात वर्षभरापूर्वी विनंती केली होती ती होऊ शकली नाही. मात्र ४८ तासांत, इतक्या कमी वेळेत दाखविलेली तत्परता ही चमत्कारिक आहे. या राज्यपालांबद्दल बोलण्यासारखे खूप आहे, परंतु बोलणार नाही, असेही पवार म्हणाले.
लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रकार
सत्ता केंद्रीकरण आणि केंद्रीय एजन्सीजचा गैरवापर करून विरोधकांची राज्य सरकारे पाडली जात आहेत. हे लोकशाहीच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका करून खासदार शरद पवार म्हणाले, केंद्रीय एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे. याच माध्यमातून विरोधकांचे खच्चीकरण करत राज्य सरकारे पाडली जात आहेत. केंद्रीय सत्तेच्या बळावर प्रथम कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आता गोवा राज्यावर या मंडळींनी लक्ष केंद्रित केले आहे, हा लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाबतीतही तेच घडले. सत्ता नाही म्हणून अस्वस्थ असलेली मंडळीच यामागे आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी केली.