(खेड)
राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी घटना 15 दिवसापूर्वी घडली होती. नाराज एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील आमदारही गेले होते. यामध्ये दापोलीचे आमदारही सामील झाले होते. त्यानंतर खेड – दापोली मध्ये त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले, तर काही मोर्चे त्यांच्या विरोधातही काढण्यात आले. नुकतेच आमदार योगेश कदम आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यांनी आपण शिंदे गटासोबत का गेलो याचे कारण सांगितले आहे.
त्यांनी सांगितले की, माजी मंत्री अनिल परब यांनी खच्चिकरण केल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला, असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याला कंटाळून गेल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मी पळून गेलेलो नाही तर आदित्य ठाकरे यांना फोन करून गुवाहाटी येथे गेलो. असाही गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच आगामी सर्व निवडणुका शिवसेनेतून लढण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.