(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथे ग्रामीण आणि कृषी पर्यटनाला चालना मिळावी तसेच भावी पिढीला शेतीचे महत्त्व समजावे, शेतीमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि पारंपरिक शेतीतून आधुनिकतेची कास धरावी यासाठी शुक्रवार 8 जुलै रोजी चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या चिखल महोत्सवाचे गाव प्रमुख राजेश कळंबटे व सरपंच ऋतुजा गोताड यांनी श्रीफळ वाढवून महोत्सवाचा शुभारंभ केला.
विद्यार्थी आणि हौशी पर्यटक या चिखल महोत्सवात सहभागी होण्यासाठी अंगावर पावसाच्या सरी झेलत, वाट तुडवत रानात पोहचले. पर्यावरणातील झाडांचं महत्त्व समजून घेत कोकणातील काजू, फणस, रातांबा या फळझाडांची लागवड करून वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी थेट शेतीत जाऊन चिखलाचा आनंद लुटत बैलांच्या नागरणीचा मनसोक्त आनंद लुटला. चिखलात पाय जरी पडला तरी शी म्हणणारी पिढी, यावेळी मात्र चिखल तुडवत मळीतील चिखल तुडवत होती. मुलांच्या या आनंदात वरून वरुण राजा बरसत करत होता.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री.काळोखे, श्री. डवरी आणि त्यांच्या टीमने या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतात होती. किती जरी शहरीकरण झाले, तरी शेती ही करावीच लागेल आणि खेड्याकडे जावेच लागेल. या विषयाला अनुसरून शेतीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थी, पर्यटकांना पटवून दिले. सोबत नांगर आणि पारंपरिक अवजारे यांची माहिती दिली आणि उपस्थित शेतकर्यांना चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रत्यक्ष रोप ओडणे, जमीन खणणे, जोत फिरवणे, ट्रॅक्टर चालवणे, लावणी लावणे ही सर्व कामे करताना बांधावरून सोपी वाटणारी शेती प्रत्यक्ष किती अवघड आहे, हे या विद्यार्थांना कळून आले. शेतकऱ्यांना किती काबाड कष्ट करावे लागतात ही गोष्ट विद्यार्थी, पर्यटकांना समजून येत होती.
अखेरीस चिखलात लोळले-माखलेल्या पर्यटक, विद्यार्थांना कडाडून भूक लागल्यानंतर त्यांनी शेतात बसून झरेवाडी गावरान मसाल्याच्या मेजवानीवर ताव मारत भागवली. पर्यटकांच्या व विद्यार्थांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र ओसंडून वाहत होता.
या उपक्रमासाठी अनंत कळंबटे आणि सुभाष व सत्यवान कळंबटे यांनी शेती क्षेत्र उपलब्ध करून दिले. तसेच हातखंबा रॉयल लायन्स क्लबचे सभासद ला. प्रतीक कळंबटे, ला.संदेश शिंदे, ला.अंकिता देसाई यांनीही या उपक्रमात उपस्थित राहून आनंद घेतला.
या उपक्रमाचे छायाचित्रण केले ते ज्ञानेश कांबळे, मयूर शेट्ये व उमेश गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थी सहभागासाठी मुख्याध्यापिका बगाडे, गोसावी आणि सर्व शिक्षक यांचे विशेष सहकार्य केले. तसेच डॉ.नीलम सावंत, रत्नदीप कदम यांनी उपक्रमाला भेट देऊन आनंद घेतला.