(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांचेवतीने झी मराठी पुरस्कृत महामिनिस्टर या कार्यक्रमाच्या महाराष्ट्राच्या महाविजेत्या व ११ लाख रुपयांची महापैठणी जिंकणाऱ्या आपल्या रत्नागिरीच्या व रोटरी परिवारातील सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा जाहीर नागरी सत्कार व प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा सत्कार, त्यांना शाल श्रीफळ भेटवस्तू व मानपत्र देऊन जिल्हा परिषद सी.ई.ओ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन व सर्व रत्नागिरी करांच्यावतीने करण्यात आला.
सदर सत्कार प्रसंगी सौ. लक्ष्मी ढेकणे यांच्या महामिनिस्टर प्रवासातील त्यांच्या सर्व सख्याही उपस्थित होत्या. या सर्व सख्यांना, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन यांचे वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या जाहीर नागरी सत्काराच्यावेळी सौ. लक्ष्मी ढेकणे यांची, महामिनिस्टर या प्रवासासंदर्भातील प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतकार सौ. दीप्ती कानविंदे यांनी सौ. लक्ष्मी ढेकणे यांचा महामिनिस्टर स्पर्धेसंदर्भातील सौ. लक्ष्मी यांच्या संपूर्ण स्पर्धा प्रवासाचा उलगडा उपस्थितांपुढे अतिशय प्रभावीपणे प्रदर्शित केला. महामिनिस्टर विजेत्या सौ. लक्ष्मी ढेकणे यांनी महाहोममिनिस्टर प्रवासा संदर्भात अगदी दिलखुलासपणे अगदी सविस्तर मुलाखत दिली. महिलांनी मागे न राहता, आत्मविश्वासाने, जिद्दीने प्रत्येक क्षेत्रात पुढे येणे आवश्यक असल्याचे सांगून जीवनात कोणत्याही स्पर्धला धैर्याने सामोरे जाण्याचा प्रेरणादायी संदेश समस्त महिला वर्गांस दिला.
जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ. इंदुराणी जाखड यांनी महिला सक्षमीकरण तसेच महिलांचा समाजपयोगी कामांमध्ये सहभाग,त्यातूनच समाजपयोगी प्रबोधन व विधायक उपक्रम चांगल्या प्रकारे कसे राबवावेत, या संदर्भात उत्तम मार्गदर्शन करून सौ. लक्ष्मी यांचे कौतुकही केले.
सदर सत्काराचे प्रसंगी सौ.लक्ष्मी मंदार ढेकणे यांनी अकरा लाखाची महापैठणी समस्त रत्नागिरीकरांना पाहण्याकरिता उपलब्ध करून दिली.
या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी बहुसंख्य रत्नागिरीकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य , रोटरी परिवारातील सदस्य व पदाधिकारी, सौ. लक्ष्मी यांच्या स्पर्धेदरम्यानच्या सर्व सख्या तसेच सौ. लक्ष्मी ढेकणे यांचे कुटुंबीय, हितचिंतक, मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होते.
फोटो- महामिनिस्टर सौ.लक्ष्मी ढेकणे यांचा रोटरी क्लब व रत्नागिरीकरांच्यावतीने जाहीर सत्कार करताना मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, सोबत मंदार ढेकणे, रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षा ॲड.शाल्मली विनय आंबुलकर