(चिपळूण)
बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटांचे एडिटिंग, व्हीएफएक्स प्रक्रिया या गोष्टी नवीन आहेत. याविषयी फार माहिती लोकांमध्ये नाही, अशा अनोख्या प्रशिक्षणाची संस्था चिपळूणमध्ये आली याचा आनंद वाटतो, अशा शब्दांत स्वागत करीत आमदार शेखर निकम यांनी ‘आचमन अकॅडमी’च्या चिपळूण शाखेचे उद्घाटन केले. २०१० पासून चित्रपट एडिटिंग, व्हीएफएक्स हे प्रशिक्षण देण्यासाठी रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या या संस्थेच्या चिपळूण शाखेचा डी. बी. जे. महाविद्यालयासमोरील आचमन अकादमीच्या सभागृहात शानदार शुभारंभ झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गवाळे, चिपळूण लायन्स क्लबचे अध्यक्ष सी. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी राजन इंदूलकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रास्ताविक भाषणात संस्था आणि प्रशिक्षण याबद्दल संचालक हर्षल पेढे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “कोकणातील तरुण वर्गाला चित्रपट व्हीएफएक्स एडिटिंग या क्षेत्राची ओळ्ख व्हावी, या क्षेत्रात त्यांनी आपले करियर घडवावे आणि माफक फीमध्ये दर्जेदार प्रशिक्षण मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इच्छा असूनही आर्थिक कारणांमुळे प्रवेश घेण्यावर मर्यादा येतात यातून मार्ग शोधण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखविली. रामपूर येथील मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व चिपळूण लायन्स क्लबचे अध्यक्ष सी. ए. कुलकर्णी म्हणाले की, बॉलीवूड ते हॉलिवूड हा आचमन अकादमीचा प्रवास कौतुकास्पद आणि अचंबित करणारा आहे. विद्यार्थ्यांनी या नव्या संधीकडे करिअरचा नवा मार्ग म्हणून पहावं आणि या संधीचा लाभ घ्यावा. या उपक्रमाला शुभेच्छा देताना डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य गवाळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अशा वेगळ्या धाटणीच्या करिअरचा विचार करावा पारंपरिक करिअरचा विचार करत असतानाच कलेच्या संदर्भातल्या करिअर संधीचा लाभ घ्यावा.
उद्घाटक म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले चिपळूणचे आमदार आणि ‘सह्याद्री एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष शेखर निकम यांनी “मनापासून शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे या क्षेत्रातील शिक्षण आपण पूर्ण करू,” असे आश्वासक उद्गार काढले. गरजू विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेपूर सहकार्य होईल याची खात्री त्यांना दिली. त्याचवेळी विद्यार्थी बऱ्याच नवनवीन क्षेत्रात नवीन शिकण्यासाठी जातात परंतु चिकाटी, अभ्यासू वृत्ती कमी पडते याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली, आणि कोंकणातील युवकांना हे चित्र बदलण्याचे आवाहन केले.
चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी शूटिंग झाल्यावर व्हीएफएक्ससारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया कराव्या लागतात, त्याचे प्रशिक्षण या संस्थेत देण्यात येते. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित व्हीएफएक्स स्टुडिओमध्ये नोकरीची हमीही दिली जाते. या अकॅडमीचे अनेक विद्यार्थी पुणे, मुंबई येथील व्हीएफएक्स स्टुडिओंमध्ये कार्यरत असून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळवत आहेत. या संस्थेत ७ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे हवेशीर वर्गखोल्या, सुसज्ज कम्प्युटर लॅब उपलब्ध आहेत, अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येईल, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
संस्थेचा विद्यार्थी रोहित नाटेकर यानेही मनोगत व्यक्त करून आपल्याल या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास प्राप्त झाल्याचे सांगितले. ‘आचमन अकॅडमी’च्या रत्नागिरी शाखेचे विद्यार्थी, चिपळूण शाखेचे विद्यार्थी, पालक व हितचिंतक नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. संस्थेच्या संचालिका सावली देसाई यांनी अत्यंत कमी वेळेत केलेल्या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आभारप्रदर्शन केले. वेदवती मसुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.