(मुंबई)
राज्यात सत्तांतर झाले आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप तसेच ऐकमेकांची उणीधुणी काढण्याचे काम सुरु आहे. तसेच शिवसेना आमदारांनंतर आता खासदार सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची चर्चा सुरु असताना, आता शिवसेनेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. शिवसेना संसदीय राजकारणाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली असताना आता भावना गवळी यांना पक्षांने धक्का दिला आहे. त्यामुळं यावर भावना गवळी यांची कोणती प्रतिक्रिया येते हे पाहवे लागेल.