(राजापूर/प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातून कर्नाटक येथे अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या टोळक्याला राजापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत ताब्यात घेतले. सोमवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ओणी-पाचल मार्गावर ही कारवाई करण्यात आली. विवेक शामराव कांबळे (41), प्रणव उर्फ रोहित अजित कांबळे (23, दोघे राहणार पडलिहाळ, ता.निपाणी, जि.बेळगांव) तसेच तबरेज चांदमियाँ ठाकुर व चांदमियाँ अब्बास ठाकुर (रा.परटवली ता.राजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन वीर यांना ओणी ते पाचल या मार्गाने एका चारचाकी गाडीतून लांजा ते निपाणी बेळगाव अशी गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी या मार्गावर सापळा लावला होता. ओणी ते पाचल रोडवर सपोनि अमोल गोरे, पोलीस नाईक वीर, पोलीस शिपाई श्री.घोगले, श्री.घोळवे तसेच वाहन चालक श्री.बाणे असे पेट्रोलिंग करीत असताना 10.15 वा.चे दरम्यान ओणी दैतवाडी गणेश मंदिर येथून चार चाकी इंडिगो गाडी व त्याच्या मागून एक महिंद्रा जिनिओ गाडी भरधाव वेगामध्ये पाचलच्या दिशेने जाताना दिसली. पोलिसांनी दोन्ही गाड्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गाडी चालकानी गाडी न थांबवता वेगाने पळवण्यास सुरुवात केली.
महिंद्रा गाडीचा हौदा कापडाने झाकलेल्या स्थितीत दिसत असल्याने पोलिसाना संशय आला. त्यांनी दोन्ही वाहनांचा पाठलाग केला. पाठलाग सुरू असताना पोलिस आपली गाडी पुढे घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र इंडिगो गाडी चालक पुढे जाण्यास अटकाव करीत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत पुढे जावुन काही अंतरावर सौंदळ पाटीलवाडीचे जवळ वळणावर गाड्या आडव्या घातल्या. चौघांनाही बाहेर काढले. पोलिसांनी गाड्यांची तपासणी केली असता गाडीच्या हौद्यामध्ये 1 बैल व 7 गायी मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात बसवून त्यांना आखुड दोरीने बांधून व कोंबुन भरून निपाणी येथे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी विवेक कांबळे, प्रणव उर्फ रोहित कांबळे तसेच तबरेज ठाकुर व चांदमियाँ ठाकुर याना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळील चार चाकी गाडी व 1 बैल, 7 गायी असा माल जप्त करण्यात आला आहे.