(रत्नागिरी)
पाली येथील डी.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात ‘ग्रीन डे’ साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. आजच्या या दिवसाची सुरुवात ‘वृक्षारोपण’ करून झाली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नूतन कांबळे यांच्या हस्ते प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेचा सर्व सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीवर्ग यांनी सुद्धा वृक्षारोपण केले. फक्त आजच्या दिवसापुरता केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे जतन देखील करणे गरजेचे आहे, असा संदेश प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी दिला. यानंतर ग्रीन डे च्या निमित्ताने प्रशालेमध्ये तीन गटांमध्ये सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पूर्व प्राथमिक गटासाठी वर्गसजावट स्पर्धा, प्राथमिक गटासाठी फळभाज्या, पूर्व माध्यमिक गटासाठी पालेभाज्या तर माध्यमिक गटासाठी औषधी वनस्पती असे विविध विषय व त्यांवर आधारित सादरीकरण असे स्पर्धेचे विषय होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नूतन कांबळे यांनी सर्व गटामधील सादरीकरण पाहिले व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कलाकौशल्याला दाद दिली. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली. सर्व विद्यार्थीवर्ग, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने आजचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला.