( खेड / प्रतिनिधी )
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 95 मिमी पाऊस पडला आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून सध्या 7.20 मीटर उंचीने पाण्याचा प्रवाह आहे. यामुळे नगर परिषद सतर्क राहण्यासाठी भोंगा वाजवून सांगण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
सोमवार दुपारपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु झाला असल्याने शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणखी काही तास पाऊस असाच कोसळत राहिला तर खेड शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. गतवर्ष जुलै महिन्यात या दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे खेदाची बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापाऱ्यांना मोठा प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला होता या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर वाढताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कापसाळ सुर्वेवाडी येथील महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. अपुऱ्या चौपदरीकरणाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे. महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे पावसाचे पाणी तुंबले आहे.. या पाण्यातून सध्या जीव मुठीत घेउन प्रवासी प्रवास करत आहेत.