(राजेंद्रप्रसाद स. मसुरकर / रत्नागिरी)
प्लास्टिक पिशव्यांवर नियंत्रण घालण्यात आल्यामुळे किराणा जिनसांसाठी देण्यात आलेल्या कागदी पिशव्या फाटून डाळी, कडधान्ये, साखर यासारखे पदार्थ एकत्र झाल्याने गृहिणींवर नवीनच आफत ओढवली आहे. हे एकत्र मिसळलेले पदार्थ चाळणीने अलग करण्याचा नवाच जास्तीचा उद्योग गृहिणींना करावा लागत आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने बंदी घातल्यामुळे दुकानदार कागदी पिशव्यांमध्ये जिन्नस बांधून देऊ लागले. नवीन महिना नुकताच सुरू झाल्याने बहुतेक दुकानांमध्ये मासिक जिन्नस भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र या कागदी पुड्या भरलेल्या मोठ्या थैल्या घरी नेताना पावसामुळे आतील पिशव्या ओल्या होऊन विसवशीत झाल्या आणि डाळी, कडधान्ये, साखर हे पदार्थ एकत्र मिसळले गेले आहेत हे थैल्या उघडताच लक्षात येऊ लागले. विशेष म्हणजे शहराशेजारील एका मोठ्या मॉलमधून या तकलादू पिशव्यांमध्ये जिन्नस देण्यात आल्यामुळे दर्जेदार पदार्थ स्वस्त किमतीत खरेदी करताना हा मनस्ताप वाट्याला आला आहे.
किराणा दुकानांमधून जिन्नस बांधण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरण्याची पद्धत अनेक वर्षांपासून अंगवळणी पडली आहे. मात्र रिकाम्या पिशव्या निष्काळजीपणाने इतस्ततः फेकून देण्याच्या नागरिकांच्या प्रवृत्तीमुळे प्लास्टिक कचऱ्याचे ढीग साचण्याची समस्या सर्वत्रच वाढू लागली. त्यातच फेकून दिलेल्या अन्नाबरोबर या पिशव्या मासे, गायी यासारख्या प्राण्यांच्या पोटात गेल्याने सजीवांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका उत्पन्न झाला. प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध येण्याचे हे प्रमुख कारण आहे.
असे असले तरी डाळी, कडधान्ये, साखर, मसाल्याचे पदार्थ यांसारख्या वस्तूंसाठी पर्याय म्हणून वापरण्यात येऊ लागलेल्या कागदी पिशव्या विशेषतः पावसाच्या दिवसांत मोठ्या थैलीत पाणी जाऊन भिजून चोथा होतात आणि थैलीतल्या थैलीतच या परस्परविरोधी पदार्थांची अभूतपूर्व सरमिसळ झाल्याचे पहायला मिळू लागले आहे.
यामुळे घरोघर गृहिणींची चिडचिड होऊ लागली असून सोयीस्कर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणाऱ्या सरकारच्या नांवाने खडे फोडत कुटुंबातील माणसे हे जिन्नस वेगळे करण्याच्या उद्योगाला लागल्याचे दृश्य काही घरांतून पहायला मिळाले. दिवसभर नोकरीला जाणाऱ्या महिला, लहान कुटुंबातील एकेकट्या गृहिणी यांनी या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे याची चर्चा ऐकू येत आहे.
1) फोटो : सव्वा महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन हे काम करण्याचा प्रसंग आलेली विवाहिता
2) फोटो : एकत्र झालेले पदार्थ अलग करण्यात गुंतलेल्या गृहिणी.
3 ) फोटो : थैलीतच एकत्र झालेले पदार्थ