( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक पेढांबे येथे चुलत भावाने दारुच्या नशेत भावाच्या डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना घडली. तानाजी मोहिते (51, पिंपळी बु. पेंढाबे) असे जखमी झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची तक्रार तानाजी मोहिते यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार प्रदीप सुखदेव मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 जुलै रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप व तानाजी हे दोघेही नात्याने चुलत भाऊ आहेत. प्रदीप याला दारुचे व्यसन आहे. 3 जुलै रोजी तानाजी मोहिते हे निसर्ग हॉटेलच्या शेजारी असलेल्या टपरीवर बसलेले असताना प्रदीप याने त्यांना अपशब्द वापरला. मात्र त्यावर तानाजी हे काहीच न बोलता घरी निघून गेले. त्यांनी याबाबची माहिती प्रदीपच्या पत्नीला सांगितली. त्यानंतर ते घरी जात असताना प्रदीप याने त्यांच्या डोक्यात मागून दगड मारला. यामध्ये तानाजी मोहिते हे जखमी झाले. घटनास्थळावरुन प्रदीप हा पळून गेला.
तानाजी यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार प्रदीप याच्यावर भादविकलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.