( प्रतिनिधी / गुहागर )
गुहागरच्या तहसीलदार कार्यालयात २८ जून रोजी ताडगोळे (पाल्मेरा पाल्म ट्री ) लागवडीची माहिती देण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेला ताडगोळे वृक्ष संवर्धन करणारे गोल्डसन सॅम्युअल उपस्थित होते. गोल्डसन सॅम्युअल यांना तामिळनाडू सरकारने फादर ऑफ फार्म या पुरस्काराने गौरविले गेले आहे. 1 मे 2022 पासून 26 दिवस सात हजार किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यातून गोल्डसन सॅम्युअल यांनी केला. या प्रवासात त्यांनी ताडगोळेच्या झाडांची लागवड आणि त्याचे उत्पादन पर्यावरणीय उपलब्धी याविषयी जनजागृती केली. भविष्यामध्ये भरपूर प्रमाणात ताडगोळेची झाडे लावण्यासाठी त्यांनी गुहागर तालुक्याची निवड केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून ताडगोळ्यांच्या 1000 बिया गुहागरच्या तहसीलदार सौ प्रतिभा वराळे यांच्याकडे सुपूर्त केल्या.
गुहागर तालुक्यात यावर्षी 3000 झाडे लावण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी एक हजार झाडे वनखात्याकडून तर पाचशे झाडे खेडमधून आणली आहेत. त्याचबरोबर गोल्डसन सॅम्युअल या ताडगोळे वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱ्या व्यक्तीने 1000 ताडगोळ्यांच्या बिया तहसिलदारांकडे आज सुपूर्त केल्या.
पुढील दिवसात तालुक्यातील विविध ठिकाणी गुहागर तालुका प्रशासन, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ताडगोळ्याच्या बियांची लागवड करणार आहे. त्याचप्रमाणे अन्य शासनमान्य रोपांची लागवड केली जाणार आहे. तत्पूर्वी गुहागर शहरामधून वृक्ष लागवड जनजागृतीसाठी श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील मुलांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती गुहागरच्या तहसीलदार सौ प्रतिभा वराळे यांनी दिली.
या कार्यक्रमाला जीवन श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत साळवी, अपरांत भूमी पर्यटन संस्थेचे विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्या सौ नेत्रा ठाकूर, कल्पतरू पर्यटन संस्थेचे अध्यक्ष निलेश सुर्वे, महाराष्ट्र राज्य जुदो संघटना राज्य कार्यकारीणी सदस्य निलेश गोयथळे आदी उपस्थित होते. या सर्वांना व्यक्तीगत लागवडीसाठी ताडगोळ्याच्या बिया गोल्डसन सॅम्युअल यांनी भेट दिल्या.