(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील रहिवासी व येथील गोपाळकृष्ण मालगुंड संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू समीर कृष्णा राजवाडकर याचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनाने मालगुंड पंचक्रोशीतील सर्वच क्रिकेट संघांकडून व ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय प्रेमळ व मनमिळावू असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते.
नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सध्या तो कार्यरत होता. मात्र यापूर्वी स्थानिक ठिकाणी असताना त्याने क्रिकेट या खेळात ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीत आपली ओळख निर्माण केली होती. तसेच गोपाळकृष्ण मालगुंड संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्याला ओळखले जात असे तर क्रिकेट खेळातील गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात माहिर असलेला समीर गोपाळकृष्ण संघासाठी प्रेरणादायी ठरला होता. मात्र अचानकपणे त्याचे निधन झाल्याने मालगुंड येथील गोपाळकृष्ण क्रिकेट संघावर मोठी शोककळा पसरली आहे. येथील गोपाळकृष्ण क्रीडा मंडळामध्ये त्याचा मोठा विशेष सहभाग असे. तसेच विविध क्रीडा व सर्वच सामाजिक कार्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असे. त्यामुळे एक हवहवसं वाटणारं तरुण व्यक्तिमत्व निघून गेल्याने संपूर्ण मालगुंड गोपाळकृष्ण मंडळाकडून व मालगुंड परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीरच्या निधनाचे वृत्त समजतात वृत्त समजताच संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीतील विविध क्रिकेट संघांचे खेळाडू ,त्याचा संपूर्ण मित्रपरिवार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेसाठी सहभागी होते. समीरच्या पश्चात आई, पत्नी , मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.