(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रूंदीकरण करताना झालेल्या डोंगर कटाई मुळे माती हळूहळू सुटत आहे. पावसामुळे या मार्गावरील दरडी कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी महामार्ग उपविभागाने घाटात काम करणार्या कंत्राटदार कंपनीमार्फत 24 तास गस्त सुरु आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसह मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे.
यातून दरड कोसळल्यास पेढे गावातील ग्रामस्थांना धोका पोहचू नये, यासाठी मोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. परशुराम गावच्या बाजूने डोंगर तीन स्टेपमध्ये कापण्यात आले आहेत. त्यामुळे दरड कोसळलीच तर थेट ती रस्त्यावर येणार नाही, अशी काळजी घेण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर कमी जास्त असल्याने आज पुन्हा पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. कापलेल्या डोंगरात पाणी शिरून सैल झालेली माती खाली येऊ लागली आहे. महामार्गावरही माती येऊन चिखल झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दर 2 तासांनी घाटाची पाहणी केली जात आहे.