(खेड/इक्बाल जमादार)
नक्षलवाद्यांशी लढताना दुखापत झालेला आपला पाय स्वतःच कापून टाकून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या खेड तालुक्यातील शिवतर येथील शुरवीरावर आधारित एक चित्रपट येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील या शूरवीराच नाव आहे कमांडो हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे. या चित्रपटाचा प्रारंभ श्री. सुर्वे यांच्या गावी रणस्तंभासमोरच झाला आहे.
या चित्रपटाचे निर्माते आहेत नीरज पाठक. त्यांनी खेड शिवतर येथे येऊन या शूरविराची शौर्यगाथा जगाच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी माजी सैनिक पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे, दिग्दर्शक मनीष शर्मा, सरपंच सुभाष मोरे, शिवतर गावचे माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रपट निर्मिती करणाऱ्या चमूचे शिवतर गावच्या माजी सैनिकांनी स्वागत केले. जामगे सैनिकी शाळेच्या मुलांनी रणस्तंभासमोर मानवंदना दिली आणि शौर्यगीत सादर केले.
आजोबा आणि वडील सैन्यात असलेल्या मधुसूदन सुर्वे यांनी मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतच्या वेळी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. हा प्रसंग अंगावर खूपच शहारे आणणारा होता. मणिपूरमध्ये घुसलेल्या ५० नक्षलवाद्यांच्या टोळीचा बीमोड करण्याची जबाबदारी कमांडो हवालदार मधुसूदन सुर्वे यांच्यावर सोपविण्यात आली होती. हेलिकॉप्टरमधून उतरून नक्षलवाद्यांशी झुंजताना एका नक्षलवाद्याने श्री. सुर्वे यांच्या सहकाऱ्याला कवेत घेतले. २० जून २००५ रोजी झालेल्या या संग्रमात प्रतिकार करताना नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात श्री. सुर्वे यांच्या डाव्या पायाला सात गोळ्या, उजव्या पायाला २ गोळ्या, पोटाला २ गोळ्या लागल्या. ते अतीव जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डाव्या पायावर गोळ्यांचा मोठा मारा झाल्याने रक्त थांबत नव्हते. ते थांबवण्यासाठी श्री. सुर्वे यांनी धाडसीपणाने एक मोठा निर्णय घेतला.
आपल्याला नक्षलवाद्यांचा कोणत्याही परिस्थितीत खात्मा करायचा आहे. जीवात जीव असेपर्यंत लढायच आहे. आणि हाच विचार घेऊन त्यांनी आपला डावा पाय खुकरीने कापून टाकला. असह्य वेदना बाजूला सारून त्यांनी पुन्हा नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला. तेव्हा खूप पाऊस पडत होता. मदत मिळणे खूप अवघड होते. अशा अवस्थेत त्यांना २४ तास मदतीसाठी तेथेच थांबावे लागले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना गुवाहाटीच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आला.
याशिवाय श्री. सुर्वे यांनी त्यांच्या नोकरीच्या काळात ऑपरेशन रायनो आसाम, ऑपरेशन रक्षक जम्मू- काश्मीर, ऑपरेशन विजय-कारगील, ऑपरेशन ऑरचिड नागालॅण्ड आणि ऑपरेशन हिफाजत मणिपूर या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. श्री. सुर्वे यांनी देशहितासाठी केलेल्या अत्यंत रोमांचक शौर्याची दखल घेऊन २००६ साली राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री. सुर्वे यांच्या या रोमहर्षक प्रसंगावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे. त्यात श्री. सुर्वे यांच्या लष्करी जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. शिवतर गावातील त्यांचे शालेय जीवन, कौटुंबिक प्रसंगांचे चित्रीकरण होणार आहे, अशी माहिती निर्माते नीरज पाठक यांनी दिली.
शिवतर गावाचा इतिहास !
खेड तालुक्यात असलेलं शिवतर हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक घरातून भारतीय सैन्यात रुजू होण्याची परंपरा आजही सुरू आहे. पहिल्या महायुद्धात सामील होऊन वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांपैकी १८ शूर सैनिक याच गावातील सुपुत्र होते. त्यांच्या वीरमरणाची आठवण म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारनं या शिवतर गावात शहीद जवानांचे वीर स्मारक बांधून दिल्याचा इतिहास आहे. या गावातून आजही बहुसंख्य सुपुत्र भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच भारतीय सैन्यात रुजू होण्याचं बाळकडू या गावात दिलं जात असल्याचं गावकरी अभिमानानं सांगतात.
मधुसूदन सुर्वे यांची कारकीर्द माझ्यासाठी खूपच स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या जीवनातून येत्या पिढीला खूप प्रेरणा मिळू शकेल. म्हणूनच या सिनेमाच्या माध्यमातून सुर्वे यांच्या देशसेवेची यशोगाथा आणि सुर्वे यांच्या गावाचा सैनिकी सेवेचा इतिहास देशातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– नीरज पाठक (दिग्दर्शक)