(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे मुक्या जनावरांबाबत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बहुलवाडी येथील शेतकरी तुकाराम शिवगण यांच्या मालकीच्या 5 जनावरानी पेंढ (जनावरांना घालण्यात आलेल कालवण) खाल्यानंतर एकाच वेळी 5 जणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, काल सोमवार 27 जुन रोजी सायंकाळी तुकाराम शिवगण यांनी नांगरकी करून बैलांना वाड्यात बांधले. त्यानंतर थकलेल्या सर्व जनावरांना त्यांनी पेंड घातली आणि ते इतर कामाला लागले. मात्र याच पेंढने त्यांच्या जनावरांचा घात केला. काही वेळातच पाचही जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 2 बैल, 1 पाडा, 1 गाय आणि 1 पाडी अशी पाच जनावरे एकाचवेळी मरण पावली. या घटनेचा पंचनामाही करण्यात आला आहे.
दरम्यान ऐन पावसाळ्यात शिवगण यांच्यावर ही वेळ आपल्यावर शेती करायची कशी असा प्रश्न उभा राहिला आहे.