( मुंबई )
शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांना ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही असे ते म्हणाले. संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम उद्या असल्यामुळे ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.