(रत्नागिरी)
वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार सायकल आणि कार बाजारात आल्या आहेत; मात्र या वाहनांबाबत तांत्रिक ज्ञान असलेले प्रशिक्षित अधिकारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नाहीत. तरी कायदेशीर माहिती घेऊन इलेक्ट्रिकल वाहने या कार्यालयाने कायद्याच्या चाकोरीत आणली आहेत. या वाहनांचे रितसर रजिस्ट्रेशन (नोंदणी), वाहन चालवण्याचा परवाना आणि वयोमर्यादा अनिवार्य आहे. जिल्ह्यात अशा १३७ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वृद्धिंगत व्हावे म्हणून परिवहन खात्याकडून त्यांना देशातील वेगवेळ्या महत्त्वाच्या संस्थांत प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. महाराष्ट्रात विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर सुरू होऊन काही वर्षे झाले तरी अजूनही परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांना त्या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रशिक्षण देण्याचे धाडस दाखवलेले नाही; मात्र येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आतापर्यंत १३७ इलेक्ट्रिकल वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. इलेक्ट्रिकल मोटारसायकल आणि कारची रितसर नोंदणी करण्यात आली आहे.
नोंदणी करण्यासाठी वाहनाचे भारविरहित वजन ६० किलो ग्रॅमपेक्षा जास्त असणारी वाहने आणि तासी कमाल वेग २५ किमीपेक्षा जास्त असणाऱ्या व वाहनास बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटारची शक्ती ०.२५ कि. वॅटपेक्षा जास्त असे आवश्यक आहे. त्या वाहनांची नोंदणी केली जाते. वाहनांची घनक्षमता ५० सीसीपेक्षा जास्त असल्याने या वाहनांसाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. परवानगीसाठी वयाची अट १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाच्या बाबतीत कोणतीही शिथिलता नाही.