(चिपळूण)
चिपळूण शहरातील खेंड बावशेवाडी बौद्धवाडी नंबर १ येथे नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी गटार बांधले आहे. मात्र, ते अद्यापही अपूर्ण आहे. गतवर्षी जुलै २०२१च्या अतिवृष्टीमध्ये या गटारात पाणी तुंबल्याने गटारातील साचलेले सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसले. खेंड बावशेवाडी बौद्धवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ या गटाराची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन माजी समाजकल्याण समिती सभापती उमेश सकपाळ यांच्यासह न.प.चे बांधकाम अभियंता परेश पवार यांच्यासह आदींनी पाहणी केली. तर उमेश सकपाळ यांनी या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत.
तुंबलेल्या गटाराची तात्काळ विल्हेवाट लावावी, अशी मागणी येथील नागरिकांनी सातत्याने नगर परिषद प्रशासनाकडे केली होती. वारंवार अर्ज, विनंत्या करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आता तर परिसरातील गटाराचे पाणी वाहून जाणारा मार्गच बंद झाला आहे. वाडीतील नागरिक वैभव मोहिते व अरुण कांबळे यांनी माजी नगरसेवक, समाजकल्याण सभापती उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधून बौद्धवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून आपण याकडे लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली असता सकपाळ यांनी तात्काळ चिपळूण नगर परिषद अधिकारी परेश पवार आणि वैभव निवाते यांच्यासह परिसराची पाहणी केली.
यावेळी तेथील एका जमीन मालकाने आपल्या जागेमध्ये संरक्षक भिंत उभारून गटाराचा मार्ग बंद केला असल्याने समोर आले आहे. चिपळूण न.प.च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बंदिस्त गटार बांधावे अथवा अन्य कोणताही पर्यायी मार्ग काढावा, अशी सूचना श्री. सकपाळ यांनी केली आहे. न.प.चे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर अर्धवट बांधलेले गटाराचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन उमेश सकपाळ यांनी नागरिकांना दिले.