रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथे कोव्हीड योध्दाला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व आरडाओरड केली. तसेच त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 12.30 वा.सुमारास घडली. निहार अहमद सुलेमान मुकरी (रा.इब्राहिमपट्टण चांदेराई मोहल्ला,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्याविरोधात इस्माईल इब्राहिम खान (39, रा. इब्राहिमपट्टण चांदेराई, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुरुवारी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ कोव्हीड मुक्त रत्नागिरी या मोहिमेचे काम करत होते. तेव्हा त्यांना निहार मुकरी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसून आला. म्हणून इस्माईल खान यांनी त्याला हटकले असता त्याने सार्वजनिक ठिकाणी त्यांना शिवीगाळ व आरडाओरड करत त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कांस्टेबल सावंत करत आहेत.