( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील नामांकित नर्सिंग कॉलेज विरोधात भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन पुकारले आहे. नर्सिंग महाविद्यालयाने विद्यार्थ्याना प्रवेश देऊ असे सांगितले मात्र अंतिम परीक्षेला विद्यार्थ्याना बसविलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नर्सिंग महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला होता. यावर प्राचार्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. यावर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा जिल्हाधिकारी पाटील यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर आता भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेच्या वतीने थेट मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले.
या नर्सिंग महाविद्यालयातील तब्बल ७४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दीड लाख रूपये उकळून विद्यार्थांना 2020-21 या वर्षात प्रवेश देण्यात येईल, असे सांगून प्रवेशच दिला नाही. तसेच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. या प्रकरणी महाविद्यालय व बोर्ड प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, GNM च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थी यांची परीक्षा तात्काळ घेऊन व्दितीय वर्षास प्रवेश मिळालाच पाहिजे. २०२० – २१ वर्षा मध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचे एका वर्षाचे व्याज विद्यार्थांना द्यावे अथवा पुढील वर्षाची फी माफ करावी, शैक्षणिक वर्ष २०२० -२१ या वर्षाची पूर्ण फी घेऊन त्या वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेस न बसणाऱ्या व विद्यार्थीनीची दोन वर्ष शैक्षणिक अथवा आर्थिक नुकसान व फसवणुक करणाऱ्या महाविद्यालय व बोर्ड प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, विद्यार्थीनीना डूब्लिकेट फी रीसीट देऊन आर्थिक नुकसान व आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच हॉस्टेलची फी घेऊन हॉस्टेल उपलब्ध न करणाऱ्या महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी. या प्रमुख पाच मागण्यांसाठी लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेच्यावतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी विद्यार्थीसह अनेक कार्यकर्ते देखील सहभागी होते.
कॉलेजने १७ विद्यार्थ्यांचा पुन्हा प्रवेश नाकारला…
सदर महाविद्यालयाचा कारभार संघटनेने उघड केल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या ४७ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थ्याना २०२३ वर्षांसाठी प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरित १७ विद्यार्थी प्रवेश मिळवण्यासाठी गेले असता त्यांचा प्रवेश महाविद्यालयाने नाकारला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र आता या १७ विद्यार्थ्याना प्रवेश कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉलेजच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल
महाविद्यालयाच्या प्राचार्य रमेश बंडगर यांच्यावर १४ जून २०२२ रोजी कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत अधिनियम भारतीय दंड संहिता १६२०, कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.