(रत्नागिरी)
लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयात एकूण १,१८१ नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी १४५ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर ४२८ पाणी योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा शासनाकडे सादर केलेल्या १,१८१ नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. या योजनांमुळे प्रत्येक गावात या योजना राबविण्यात येवून पाण्याची कायमची समस्या मिटणार आहे.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नळ कनेक्शनवर पाणीपट्टी वसुल करण्यात येणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रम गावागावात राबविण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही योजना मार्गीही लागल्या आहेत.