(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप झालेला असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने तब्बल ११ तास चौकशी केली. यावेळी अनिल परब यांचे समर्थक ईडी कार्यालायसमोर जमले होते. ही चौकशी आजही सुरूच राहणार आहे. ही चौकशी संपल्यानंतर अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अनिल परब यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर २७ मे रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ते गेले नाहीत. काल एकीकडे हाय व्होल्टेज ड्रामा सुरूअसताना दुसरीकडे अनिल परब यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. ही चौकशी अद्याप संपलेली नाही.
सर्वात महत्त्वाची बाब ही की, रिसॉर्टच्या बांधकामाची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळेच या रिसॉर्टची चर्चा झाली आणि त्यावरून कारवाई सुरू झाली. आयकर विभाग शोध घेत असताना आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम २०१७ मध्ये सुरू झालं आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी ६ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्या बांधकामाचा खर्च केबल ऑपरेटर आणि अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाही. त्यामुळे या रिसॉर्टवरून अनिल परब अडचणीत आले असल्याचे सांगण्यात येते.
तर सदर चौकशी पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हा दापोली रिसॉर्ट प्रकरणी चौकशी होणार आहे. तर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला माजी खासदार किरीट सोमय्या आरोप करत असलेल्या साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे पत्र ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे. राज्याने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.