(खेड/प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील पाडले येथील उभ्या धोंडीजवळील तब्बल 1 कोटी 98 लाख रूपये खर्च करून नव्याने बांधलेला रस्ता पहिल्याच पावसात खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या सुमार दर्जाबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
3 जून 2020 रोजी घोंगावलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्याने समुद्रात उसळलेल्या पाण्याच्या लाटा आदळून पाडले येथील उभ्या धोंडीजवळील रस्त्याची बाजू ढासळली होती. त्यामुळे दापोली हर्णेकडून आंजर्ले समुद्रकिनारपट्टी भागातून पाडले, आडे, केळशी, मांदिवली, देव्हारे, मंडणगडकडे जाणारा हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला होता.
रस्त्याअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून ही बाब दापोली पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि पाडले ग्रामपंचायतीचे विदयमान सरपंच रविंद्र सातनाक यांनी आम.योगेश कदम यांच्या निदर्शनात आणून दिली. त्याची आम.योगेश कदम यांनी तातडीने दखल घेवून ढासळलेल्या रस्त्याच्या दुरूस्ती कामासाठी शासनाच्या पूरहानी या शिर्षाखालील योजनेतून 1 कोटी 98 लाखांचा विकास निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसह संरक्षण भिंत उभारण्याचे काम मार्गी लागले आणि या मार्गावरील खंडीत वाहतुक पूर्ववत सुरू झाली. मात्र बांधकामानंतरच्या पहिल्याच पावसात पुन्हा रस्ता ढासळल्याने या मार्गावरील एस.टी सेवा बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी पाडले ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र सातनाक यांनी केली आहे.