(रत्नागिरी)
कोकणवासियांना आनंदात न्हाऊन नेणारा सण म्हणजे गणेशोत्सव. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होतो. गेली दोन वर्षे कोरोनाचा कालावधी, गणेशमूर्तीवरील निर्बंध, महागाई यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. यावर्षी जिल्ह्यातील गणेश मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरू झाली असून सुबक गणेशमूर्ती आकार घेत आहेत. हा व्यवसाय आर्थिक संकटात असला तरी पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या चित्रशाळांवरील आर्थिक संकट विघ्नहर्ता दूर करेल, या आशेवर जिल्ह्यात मूर्तिकामाला सुरवात झाली आहे.
कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला या वर्षी ३१ ऑगस्टला श्री गणेशाचे आगमन होणार आहे. सुबक व रेखीव शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो; पण या उत्सवाला अडीच महिने बाकी आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.
जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे १ लाख ६६ हजार ५८७ ठिकणी खासगी तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. त्याप्रमाणे शहरी आणि ग्रामीण भागात प्रसिद्ध कलाकारांकडे दोनशे ते पाचशेच्या आसपास गणेशमूर्ती तयार होतात. तसेच काहींकडे पन्नास ते शंभर मूर्ती तयार करण्यात येतात. गणेशमूर्तीच्या साहित्यात जसे शाडू माती, कलर, प्लास्टर व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईचे संकट तोंडावरच आहे; पण पिढ्यानपिढ्या सुरू असलेली ही कला जोपासण्याचे काम केले जात आहे.
शाडू मूर्तीची मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी खासकरून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते; मात्र शाडू मातीच्या दरात दिवसेंदिवस वाढ, सफाईदार कारागीर उपलब्ध होत नसल्याची खंत मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण अथवा शहरी भागात गणेशमूर्तीसाठी दरफलक तालुका मूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.
साच्यामधील मूर्ती एक फुटाची १ हजार २०० रुपये तर कलाकारांच्या कला कौशल्याने तयार झालेली एक फुटाची मूर्ती २ हजार ५०० रुपये दराने आकारला जाणार आहे. तसेच मूर्तीसाठी डायमंड वर्कसाठी एक हिरा मोठा लावण्यासाठी दहा रुपयेप्रमाणे दर, तर धोतर, शेला, फेटा (२ फूट गणपती) १ हजार ५०० रुपये दर आकारण्यात येणार आहेत.