(रत्नागिरी)
राजकीय कुणबी पदाधिकारी या व्हॉट्सअप ग्रुपवर एका तरुणाने कुणबी समाजाच्या माता-भगिनीबाबत आक्षेपार्ह विधान करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. संबंधित व्यक्ती विकृत असून यावर पोलिसांनी योग्य ती कडक कारवाई केली नाही, अन्यथा महिला भगिनी रस्त्यावर उतरतील, असे रोखठोक मत कुणबी समाजाचे नेते नंदकुमार बेंद्रे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, राजकीय कुणबी पदाधिकारी ग्रुपवर वैभव वारीशे (मूळ गाव आडिवरे, सध्या वास्तव्य मुंबई ) याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, अशा विकृतीला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. अशा प्रकारे एकाच हिंदू धर्मातील दोन जातींमध्ये तेढ निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये राजकीय पदाधिकारीसुद्धा आहेत. परंतु अशा विकृतपणे केलेल्या विधानाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत. कुणबी समाजाच्या माता-भगिनीबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आणि आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संबंधितावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना याबाबत निवेदन देऊन यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देण्याकरिता कुणबी समाजाचे नेते नंदकुमार बेंद्रे, पंचायत समिती माजी उपसभापती विजय सालीम, माजी पंचायत समिती सदस्य सौ. स्नेहा चव्हाण, अनंत सलपे, सौ. शरयू गोताड, निकेश कळंबटे, रविंद्र भोवड, तुषार कांबळे, विशाल भारती, मदन मांडवकर, सलील डाफळे, संदेश भिसे, वैभव वाडेकर, मंदार नैकर आदी उपस्थित होते