( खेड )
रत्नागिरी व सातारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतं आहे. पावसाळ्यात या निमुळत्या घाटात दरडी कोसळून हानी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
महाबळेश्वरातील 20 ते 25 गावांना जोडणारा रघुवीर घाट 12 किलाेमीटर लांबीचा आहे. समुद्र सपाटीपासून 760 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदाट खोऱ्यातून खेड तालुक्याला जोडणाऱ्या या घाटातून प्रवास करताना हृदयाचे ठोके धडधरायला लागतात.
गेल्या काही वर्षांत रघुवीर घाट पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन बनले आहे. याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र अचानक दरड कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. घाटात पावसाळ्यात अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये एसटी बसेस अडकून पडल्या होत्या. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रघुवीर घाट वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित करावा अशी मागणी पर्यटक व वाहन चालकांतून होत आहे.