(रत्नागिरी)
सुधारित पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता जेवढा पाणी वापर, तेवढे पाणी बिल ग्राहकाना येणार आहे. त्यामुळे वायफळ पाणी वापरावर आता अंकुश बसणार आहे, कारण पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून १० हजार २८८ पाणी मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६० टक्केच्यावर मीटर बसवून झाली आहे. मात्र ही मिटर चोरीला जाऊ नये म्हणजे मिळविले, अन्यथा सर्व मुसळ केरात असेच म्हणावे लागेल.
रत्नागिरी शहराची खराब झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेने नागरिक हैराण होते. अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली होती, तुंबली होती, फुटली होती. मात्र पालिकेकडे जुन्या पाणी योजनेचा नकाशा नसल्याने दुरूस्तीमध्ये अडथळे निर्माण होत होते. पाणी वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे पालिकेच्या नावे नागरिक ओरड करीत होते. दरदिवशी विविध भागातील महिला पालिकेवर मोर्चा आणत होते. त्यात मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्यान ३० ते ४० टक्के पाणी वाया जात होते.
यापूर्वीदेखील पालिकेने नळ जोडणीला मिटर बसविली होती. परंतु कालांतराने या मिटरची चोरी होऊ लागली. अनेक भंगार व्यवसायिकांनी ती चोरल्याचा दावा तेव्हा पालिकेने केला होता. त्यामुळे पाणी वापरावर आतो कोणताही बंधन नव्हते. मात्र सुधारित पाणी योजना आता पुर्नत्वास जात असल्याने पाण्याचे योग्य वितरण व्हावे आणि वितरण होणाऱ्या पाण्याचे मोजदाद व्हावी, यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मोफत शहरातील १० हजार २८८ नळ जोडण्यांवर मिटर बसविण्याचा निर्णय घेतला.
याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता सुमारे ६० टक्के जोडण्यांवर पाणी मिटर बसविण्यात आली आहे. आयएसओ प्रमाणित ही मिटर असून जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल आता शहरवासियांना भरावे लागणार आहे.