(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील क्रांतीनगर रिक्षा स्टॉप जवळ पूर्व वैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणावर धारदार तलवारीने पायावर, हातावर सपासप तीन वार करण्यात आले आहेत. राजेंद्र विटकर (वय ३२, क्रांतीनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्ला करून हल्लेखोर फरार झाले आहेत. हल्ला झाल्याच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला असून या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस निरीक्षक श्री . सासने, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. वाघमारे व अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज दुपारी मित्रांबरोबर दारू पित असताना वाद झाला होता. यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.