(रत्नागिरी)
मिरकरवाडा बंदरावर नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौकांवरील वेगवेगळ्या साहित्यांची अनोळखींकडून वारंवार चोरी होत असल्याने नौका मालक हैराण झाले आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या १५ तारखेनंतर अशा चोऱ्यांना ऊत येतो. पाच ते सहा जणांची टोळी यात सक्रिय आहे. मिरकरवाडा प्राधिकरण व पोलिसांनी अशा चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नौकामालकांनी केली असून, पोलिस ठाण्यात तक्रारही केली आहे. लवकरच या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून सुरू होणार आहे, परंतु पर्ससीन नेट नौकांची मासेमारी १० मे पासूनच बंद होते. १० मे पर्यंत बहुसंख्य मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरात आणून उभ्या केल्या जातात. नौकेतील जाळी, डिझेल बॅरल व इतर साहित्य हळूहळू नौकेतून काढून नेले जाते.
दरवर्षी याच कालावधीत चोऱ्या वाढतात. चोऱ्यांमुळे नुकसानीत गेल्यामुळे नौकामालक पुढे काही दिवस चोर शोधत राहतात. नौकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून काही वेळेला संशयितांना पकडून चोपही दिला आहे.
सहा जणांची टोळी
मिरकरवाडा बंदरात प्रामुख्याने पर्ससीन नेट नौका उभ्या करण्याचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी अनेक नौकामालकांना अशा चोऱ्यांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. सहा जणांची टोळी यात सक्रिय आहे. मात्र, या टोळीचा अतिरेक झाल्याने आता नौकामालकच त्याच्या विरोधात पुढे आले आहेत. त्यापैकी काहींनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून एका संशयितावर पोलिसांची नजर आहे. त्यामुळे या टोळीचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
डिझेलही चोरीस जाते
नौकांवरील जाळी, जाळ्यांना सभोवताली असणारे शिसे आणि तांब्याच्या किंवा पितळेच्या कड्या चोरण्याचे प्रमाण या कालावधीत मोठ्या प्रमाणात असते. अनेकवेळा नौकांवरील बॅरलमध्ये असणारे नौकांचे डिझेलही चोरीस जाते. दरवर्षी १५ मेनंतर हे चोरीचे प्रकार वाढत जातात.