(रत्नागिरी)
कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला पन्नास हजार रुपये सानुग्रह साह्य देण्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यात कोरानामुळे आतापर्यंत २,५३४ जणांचा मृत्यूंची नोंद झाली. शासनाकडून दिल्या जाणार्या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत ३ हजार १८६ नातेवाईकांनी अर्ज केले असून त्यातील १ हजार ९२९ अर्ज मंजूर करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने ४ आक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला आपत्ती प्रतिसाद निधीमधून साह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामध्ये कोरोनामुळे निधन झालेली व्यक्ती किंवा कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केलेली व्यक्ती यांना लाभ मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या सानुग्रह अनुदानासाठी आतापर्यंत कोरोनाकाळात २५३४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनुदानासाठी अर्ज केलेल्यांची एकूण संख्या ३ हजार १८६ इतकी आहे. हे अनुदान सहाय्य देण्याकरिता मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोविड आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने शासनाने याकरिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात २ हजार ५३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सानुग्रह अनुदानासाठी ३ हजार १८६ नातेवाईकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १,६८२ अर्ज थेट मंजूर करण्यात आहे. तर २४७ अर्ज कमिटीच्या मान्यतेनंतर मंजूर करण्यात आले. आतापर्यंत ६४७ अर्ज अपात्र केले आहेत. त्यांना अपिल करण्याची संधी दिली आहे. समितीकडे वर्ग केलेल्या ५५७ अर्जांपैकी २४७ मंजूर करण्यात आले, तर ८ अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. त्यांना अपिलाची संधी मिळणार नाही. आतापर्यत सुमारे ४०० अर्ज जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी सुमारे ३०० नातेवाईक वारंवार संपर्क करुनही कागदपत्रे पुर्ण करण्यासाठी येत नसल्याचे पुढे आले आहे.