(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागातील सुमारे 200 हून अधिक कर्मचार्यांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार थकल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक गोष्टींमुळे हा पगार रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वेतन थेट कर्मचार्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला कर्मचारी, अधिकार्यांची पगार बिले कोषागार विभागाला सादर केली जातात. त्यानंतर सर्वसाधारणपणे 1 ते 5 तारखेपर्यंत पगार जमा होतात.
मार्च, एप्रिल या दोन महिन्यांच्या वेतनासाठी आवश्यक एक कोटीहून अधिक निधी प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे ही अवस्था निर्माण झाली असून याबाबत कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्जाचे, विम्याचे हप्ते, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च यासह विविध गोष्टींसाठी हे सर्व कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत.