(रत्नागिरी)
विधान मंडळातील पॉवरफुल समिती असलेल्या पंचायत राज समिती 26 ते 28 मे या कालावधीत जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होती. मात्र काही कारणांमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. तसे पत्र जि. प.ला प्राप्त झाले आहे. यामुळे सध्या तरी कर्मचारी व अधिकारी यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्या निधीचा खर्च कशा प्रकारे झाला, कुठे झाला हे पाहण्यासाठी दर पाच वर्षांनी विधी मंडळातील महत्त्वाची पॉवरफुल समिती समजल्या जाणार्या पंचायत राज समितीचा दौरा आयोजित करण्यात येतो. या समितीला दोषी कर्मचार्यांसह अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार आहेत. यामुळे या समितीचा दर पाच वर्षांनी चांगलाच बोलबोला असतो.
जिल्ह्यात ही समिती 26 ते 28 मे या कालावधीत येणार होती. तसे पत्र जिल्हा परिषदेकडे आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद व 9 पंचायत समिती यांच्यासह शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये धावपळ सुरू झाली आहे. सर्व कर्मचारी अपूर्ण राहिलेले रेकॉर्ड पूर्ण करण्याच्या कामात गुंतलेले होते.
त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी धास्तावले होते. समितीची बडदास्त ठेवण्यासाठी तसेच कामकाजात त्रुटी राहू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जात होती. कामकाजात काही त्रुटी राहू नयेत यासाठी अधिकार्यांच्या बैठकांवर बैठका सुरू होत्या. आता मात्र ही समितीच नियोजित तारखेला येणार नसल्याचे पत्र जि. प. प्रशासनाला प्राप्त झाले आहे. काही कारणास्तव समितीचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. एवढेच पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे पुढे हा दौरा कधी होणार याबाबत अनभिज्ञता आहे. मात्र सध्या तरी कर्मचारी व अधिकार्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.