कोरोना प्रतिबंधक लॉकडाउनच्या काळात व्यवसाय ठप्प झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेली मदत त्यांना थेट मिळणार आहे. त्यासाठी घाई करू नये किंवा कोणत्याही प्रकारे, कोणाकडेही आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे देऊ नयेत, अशी सूचना शिवसेना प्रणित जिल्हा रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपजिल्हा संघटक अविनाश कदम यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या लॉकडाउनमुळे रिक्षाव्यवसाय ठप्प झाला असून रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीची रक्कम परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे. मदत मिळवून देतो असे सांगून फसविण्याचे प्रकार होऊ शकतात. ते टाळण्यासाठी श्री. कदम यांनी व्यावसायिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.