(सिंधुदुर्ग)
किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटनासाठी कोल्हापूर येथून आलेल्या ३ पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत किल्ल्यावरील राणीची वेळ येथील तटबंदीचे दगड उखडून टाकले. हा प्रकार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना समजताच धावपळ सुरू झाली. लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या पर्यटकांना ताब्यात घेतले. याबाबत पुरातत्व विभागाकडून मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची कार्यवाही रात्री सुरू होती. दरम्यान, या घडलेल्या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.